आरोग्य ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ शिक्षण सामाजिक

विद्यार्थ्यांच्या घोषणांनी दुमदुमला पिंपळे गुरव परिसर

विद्यार्थ्यांच्या घोषणांनी दुमदुमला पिंपळे गुरव परिसर

‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’चा संदेश देत स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती

उमेश सणस
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, झोन ‘ड’, वॉर्ड क्रमांक २९ आणि बेसिक्स संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत डिवाइन इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपळे गुरव येथे विद्यार्थ्यांची स्वच्छता जनजागृती रॅली उत्साहात पार पडली.
रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’, ‘कचरा कचरापेटीतच टाका’, ‘ओला व सुका कचरा वेगळा करा’, ‘प्लास्टिकचा वापर टाळा’ तसेच ‘स्वच्छता हीच सेवा’ अशा घोषणांद्वारे नागरिकांचे लक्ष वेधले.
या वेळी विद्यार्थ्यांनी नागरिकांना कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. स्वच्छ परिसर राखणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.महापालिकेच्या नगरसेविका व शिक्षण सभापती रवीनाताई आंघोळकर यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षक, बेसिक्स कर्मचारी, मनपा कर्मचारी व अधिकारी यांना संबोधित केले. घरातील कचरा योग्य पद्धतीने संबंधित कचरा संकलन वाहनातच द्यावा, रस्त्यावर कचरा टाकू अथवा जाळू नये आणि प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. ‘आपला कचरा, आपली जबाबदारी’ या संकल्पनेतून स्वच्छतेचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमास सहाय्यक आरोग्य अधिकारी साबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
रॅलीस डिवाइन इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या संगीता बोराटे व शिक्षकवृंद, मुख्य आरोग्य निरीक्षक शंकर घाटे, आरोग्य निरीक्षक रश्मी तुंडलवार, आरोग्य मुकादम राहुल ओवाळ, बेसिक्स झोन इन्चार्ज सुखदेव लोखंडे, वॉर्ड इन्चार्ज विजय पेंडे, बेसिक्स टीम सदस्य तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे स्वच्छता, कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती झाली. ‘स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून’ हा संदेश या रॅलीतून प्रभावीपणे देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *