गुन्हेगारी ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण सामाजिक

गणेशोत्सव शांतता, सामाजिक सलोखा जपत साजरा करा

गणेशोत्सव शांतता, सामाजिक सलोखा जपत साजरा करा

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शांतता समितीची बैठक

डीजे-लेझरमुक्त उत्सव, वर्गणी वसुली, वाहतूक आणि महिला सुरक्षेवर चर्चा

उमेश सणस
पिंपरी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शांतता समितीची बैठक घेण्यात आली. गणपती उत्सव हा श्रद्धा, आनंद आणि एकोप्याचा उत्सव असून, तो शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा जपत साजरा व्हावा, यासाठी बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. शहरातील कायदा व सुव्यवस्था, शांतता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.
याप्रसंगी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नागरिक, महिला भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जबरदस्तीने वर्गणी गोळा केल्यास खंडणीचे गुन्हे दाखल होणार 
जोर-जबरदस्तीने वर्गणी गोळा केल्यास संबंधित मंडळांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला. तसेच गणेशोत्सव डीजे व लेझरमुक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यावर भर देण्यात आला. डीजेमुळे वाहतूक कोंडी होण्यासह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांना त्रास होत असल्याने ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतुकीचे योग्य नियोजन करा
विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, आळंदी येथे होणारी गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम तलावांचा वापर वाढवावा, अशी सूचना करण्यात आली. प्रत्येक गणेश मंडळाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच बंद असलेले महानगरपालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत, अशी मागणी करण्यात आली. महिला सुरक्षेसाठी मंडळांनी पाच जबाबदार कार्यकर्त्यांचे संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावावेत, अशी सूचनाही करण्यात आली.

विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवा 

विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविणे, रस्त्याच्या कडेला उभी असलेली नादुरुस्त वाहने हटविणे आणि मंडप उभारताना खोदलेले खड्डे उत्सवानंतर व्यवस्थित बुजविण्याची जबाबदारी संबंधित मंडळांनी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *