गुन्हेगारी ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण वाहतूक सामाजिक

शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल

शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल

‘दादा-भाऊं’च्या दबावानंतरही मंडळांच्या अध्यक्षांची धरपकड

– आवाज वाढव डीजे अंगलट; ४० मंडळांचे साहित्य जप्त

पिंपरी : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजात ‘डीजे’ वाजवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांविरोधात यंदा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गर्दीचा फायदा घेत नियम धाब्यावर बसविणाऱ्या मंडळांच्या मिरवणुकीत पोलिसांनी थेट प्रवेश करून ‘डीजे’ बंद पाडले. कारवाई रोखण्यासाठी काही ठिकाणी ‘दादा-भाऊ’ तसेच लोकप्रतिनिधींकडून दबाव आणण्याचे प्रयत्न झाले; मात्र पोलिसांनी त्याला न जुमानता कारवाई सुरूच ठेवली. आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात  आले असून, ४० मंडळांचे ‘डीजे’ साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गणपती विसर्जन मिरवणुकीत निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात ‘डीजे’ वाजविणे, उच्च क्षमतेच्या साऊंड सिस्टीमचा वापर करणे तसेच लेजर लाईटचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. संबंधित मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच ‘डीजे’ चालक-मालकांना कारवाईच्या कक्षेत आणण्यात आले असून, ‘डीजे’चे साहित्यही जप्त करून पोलिस ठाण्यात आणले जात आहे. गणेशोत्सवापूर्वी पोलिसांनी मंडळांच्या बैठका घेऊन ध्वनिप्रदूषण टाळण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ‘डीजे’चे साहित्य जप्त करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केले. अनेक ठिकाणी ‘डीजे’च्या भिंती उभ्या करून कर्णकर्कश्श् आवाजात मिरवणुका सुरू झाल्या. पोलिसांनी सुरुवातीला संबंधित मंडळांना आवाज कमी करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, काही ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर काही ठिकाणी पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनी मोठ्या गर्दीत प्रवेश करून ‘डीजे’ बंद पाडले. मिरवणुका थांबवून संबंधित मंडळांचे पदाधिकारी, ‘डीजे’ चालक आणि मालकांची माहिती घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले. कारवाईदरम्यान काही ठिकाणी मंडळांच्या समर्थनार्थ स्थानिक लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. कारवाई सौम्य करण्यासाठी काहींकडून पोलिसांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली; मात्र यावेळी पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता नियमभंग करणाऱ्या मंडळांवर कारवाई सुरूच ठेवली.

या भागात झाले गुन्हे दाखल

परिमंडळ एकमध्ये निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन, पिंपरीमध्ये दोन आणि सांगवीमध्ये दहा अशा एकूण १५ मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परिमंडळ दोनमध्ये बावधन येथे चार, काळेवाडीत पाच, हिंजवडीत एक आणि वाकडमध्ये २३ अशा एकूण ३३ मंडळांवर कारवाई झाली. परिमंडळ तीनमध्ये एमआयडीसी भोसरी आणि भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी दोन, तर चाकण दक्षिणमध्ये दोन मंडळांवर अशा एकूण सहा मंडळांवर गुन्हे दाखल झाले. परिमंडळ चारमध्ये तळेगाव दाभाडे येथे पाच, तळेगाव एमआयडीसी येथे एक, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी येथे एक आणि शिरगावमध्ये दोन अशा एकूण नऊ मंडळांवर कारवाई करण्यात आली. अशाप्रकारे चारही परिमंडळांत एकूण ६३ मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाकडमध्ये सर्वाधिक २३ गुन्हे

वाकडमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी सर्वाधिक २३ मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याखालोखाल सांगवीमध्ये दहा, काळेवाडी आणि तळेगाव दाभाडे येथे प्रत्येकी पाच, बावधनमध्ये चार आणि निगडीत तीन मंडळांवर कारवाई झाली. उर्वरित पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एक ते दोन मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *