पुनावळेत कारमधून ५० लाखांची चोरी; दोन आरोपी आठ तासांत जेरबंद
गुन्हे शाखा युनिट-२ आणि रावेत पोलिसांची संयुक्त कारवाई; चोरीच्या रकमेपैकी १० लाख रुपये हस्तगत
पिंपरी : पुनावळे येथे कारमध्ये ठेवलेली ५० लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याच्या गुन्ह्याचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवघ्या आठ तासांत छडा लावला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या रकमेपैकी १० लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. गुन्हे शाखा युनिट-२, मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १०.५० ते मध्यरात्री १२.१५ या कालावधीत पुनावळे येथील संदिप हॉटेलसमोरील सिमेंटच्या सेवा रस्त्यावर उभ्या असलेल्या कारचे बनावट चावीच्या साहाय्याने कुलूप उघडण्यात आले. त्यानंतर कारमध्ये ठेवलेली ५० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरून नेण्यात आली. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखा आणि रावेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यामध्ये एका व्यक्तीने बनावट चावीने कार उघडून रोकड असलेली बॅग चोरून नेल्याचे दिसून आले. तपासादरम्यान फिर्यादीसोबत मुंबई येथे पैसे आणण्यासाठी गेलेल्या दोन व्यक्तींपैकी चारुदत्त शिवाजी बेंडाले याच्यावर संशय निर्माण झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर या गुन्ह्यातील दुसरा आरोपी प्रसाद शिवाजी बनकर याचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी प्रसाद शिवाजी बनकर (वय २९, व्यवसाय सुपरवायझर, रा. चिबळी, ता. खेड, जि. पुणे) आणि चारुदत्त शिवाजी बेंडाले (वय ३०, बांधकाम व्यावसायिक, रा. निघोजे, बेडाले वस्ती, ता. खेड, जि. पुणे) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या रकमेपैकी १० लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. उर्वरित रकमेबाबत पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव, गुन्हे शाखा-१ चे सहाय्यक पोलीस आयुक्त सुदर्शन राठोड आणि वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुन्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट-२, मालमत्ता विरोधी पथक, रावेत पोलीस ठाणे आणि तांत्रिक विश्लेषण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.