प्रवाशाची हरवलेली पिशवी तत्परतेने परत मिळवून देणाऱ्या PMPMLआगारप्रमुख सुनील दिवाणजी यांचे कौतुक!
प्रवाशांच्या सेवेसाठी PMPMLकर्मचाऱ्यांची तत्परता; प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षतेतून जनतेचा विश्वास अधिक दृढ
उमेश सणस
पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या सेवेसाठी दाखवलेली तत्परता, जबाबदारी आणि सहकार्य यांचा प्रत्यय नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून आला आहे. प्रवासादरम्यान बसमध्ये विसरलेली प्रवाशाची पिशवी तातडीने शोधून सुखरूप परत मिळवून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल PMPML चे आगारप्रमुख सुनील दिवाणजी यांचे विशेष कौतुक होत आहे.
अभिनंदन कासार हे शिवाजीनगर येथून सुसगाव येथे PMPML बसने प्रवास करत होते. मार्केट यार्ड ते घोटावडे या मार्गावर धावणाऱ्या बसमधून सुसगाव येथे उतरताना त्यांच्याकडे एक सॅक आणि एक पिशवी होती. मात्र, बसमधून उतरल्यानंतर त्यांची एक पिशवी बसमध्येच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी PMPML चे आगारप्रमुख सुनील दिवाणजी यांच्याशी संपर्क साधून घडलेली घटना सांगितली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत दिवाणजी यांनी तातडीने बसच्या तिकिटाचा फोटो मागवून संबंधित वाहकांशी संपर्क साधला. तसेच, प्रवाशाची हरवलेली पिशवी शोधून ती परत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली. त्यांच्या तत्पर सहकार्यामुळे अभिनंदन कासार यांना आपली पिशवी सुखरूप परत मिळाली.
प्रवाशांच्या अडचणीला तत्पर प्रतिसाद देणे, त्यांच्या सामानाबाबत संवेदनशीलता दाखवणे आणि समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे, हे सार्वजनिक वाहतूक सेवेतील महत्त्वाचे गुण आहेत. सुनील दिवाणजी यांनी दाखवलेली कर्तव्यदक्षता आणि सहकार्यभावना ही इतर कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. या घटनेबद्दल अभिनंदन कासार यांनी सुनील दिवाणजी यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, अशा कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचे PMPML प्रशासनाने कौतुक करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
PMPML ही केवळ प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणारी सेवा नसून, नागरिकांचा विश्वास आणि सुरक्षितता जपणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. कर्मचाऱ्यांची तत्परता, प्रामाणिकपणा आणि प्रवाशांप्रती असलेली आपुलकी यामुळे महामंडळाची प्रतिमा अधिक उजळते.