क्रीडा

किल्ल्यांच्या प्रतिकृतींतून बालचिमुकल्यांनी जागविला स्वराज्याचा इतिहास! उन्नती सोशल फाउंडेशनच्या किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात; २५ स्पर्धकांचा गौरव

पिंपळे सौदागर, दि. १५ : छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वराज्याचा इतिहास आणि गड-किल्ल्यांची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘किल्ले बनवा’ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या स्पर्धेत बालचिमुकल्यांनी आपल्या कल्पकतेतून विविध गड-किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारत स्वराज्याच्या इतिहासाला उजाळा दिला. विजेत्यांसह सुमारे २५ स्पर्धकांचा यावेळी गौरव करण्यात आला.

रविवारी (दि. १५) सकाळी पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. स्पर्धेत युवराज राऊत आणि गोपाल प्रतिष्ठान यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्वराज प्रतिष्ठान यांनी द्वितीय, तर आरती पुजारी यांनी तृतीय क्रमांक मिळविला. श्रीयांश कुंजीर, आदित्य रोडे आणि आम्ही शिवबाचे मावळे यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सहभागी अन्य स्पर्धकांनाही उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन प्रोत्साहन देण्यात आले.

कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे, नगरसेविका अनिता काटे, केशव शंखनाद पथकाच्या प्रणिता अवधूत, सामाजिक कार्यकर्त्या शारदा मुंडे, लिनियर गार्डन ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अशोक वारकर, आनंद हास्य योगा क्लबचे अध्यक्ष दिगंबर राजगुरे, अनिल कुलकर्णी, रमेश वाणी, राजू शेलार आणि उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने झाली. त्यानंतर फिरोज मुजावर यांनी गणेश वंदना सादर केली. त्यांच्या नृत्याविष्काराला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भामिनी महाले आणि सागर बिरारी यांनी केले.

गड-किल्ल्यांच्या माध्यमातून इतिहासाची ओळख

आजच्या डिजिटल युगात मुलांना आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करताना मुलांनी इतिहासाचा अभ्यास करण्याबरोबरच आपली कलात्मकता आणि कल्पकता दाखवून दिली. अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण होते आणि आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमानाची भावना वाढीस लागते.

यावेळी डॉ. कुंदाताई भिसे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रत्येक पिढीने समजून घेण्याचा आणि त्यातून प्रेरणा घेण्याचा विषय आहे. गड-किल्ले हे आपल्या शौर्याचे आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत. मुलांनी स्वतःच्या कल्पकतेतून किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारून इतिहासाशी जोडले जाणे ही आनंदाची बाब आहे. अशा स्पर्धांमुळे मुलांच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो आणि संस्कृतीविषयी अभिमान निर्माण होतो.

स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आयोजकांनी समाधान व्यक्त केले. सहभागी बालचिमुकले, पालक आणि सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *