ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण वाहतूक व्यवसाय सामाजिक

भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट, सुरक्षारक्षक, जनरल कामगार युनियनच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा उत्साहात

भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट, सुरक्षारक्षक, जनरल कामगार युनियनच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा उत्साहात

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संस्थापक अध्यक्ष अनुप मोरे यांच्या कामाचे केले कौतुक

उमेश सणस
पिंपरी : जुन्या कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगारांना न्याय देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. चिंचवड येथे आयोजित भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक, जनरल कामगार युनियनच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
चव्हाण यांनी सांगितले की, नवीन कामगार कायद्यांमुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना भविष्य निर्वाह निधी, आभा कार्डच्या माध्यमातून आरोग्यविषयक लाभ यासह विविध सुविधा मिळणे सुलभ झाले आहे. कामगारांना कायद्याच्या चौकटीत संरक्षण मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संघटनेने अल्पावधीत १५ हजार सदस्यांची नोंदणी केल्याचे सांगत चव्हाण यांनी संस्थापक अध्यक्ष अनुप मोरे यांच्या कामाचे कौतुक केले. संघटनेचे ५० हजार सदस्य नोंदणीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी भाजपा कामगारांच्या पाठीशी राहील, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
संस्थापक अध्यक्ष अनुप मोरे यांनी संघटना २०१४ मध्ये स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. महाराष्ट्रात सध्या १५ हजार सदस्य नोंदणीकृत असून ५० हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. कामगारांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून त्यांच्या न्यायासाठी लढत राहण्याचा निर्धारही मोरे यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी २०२९ मधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या समर्थनार्थ काम करण्याचे आवाहन उपस्थित कामगारांना केले.
या मेळाव्यात नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महापौर रवि लांडगे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, पक्षनेते प्रशांत शितोळे, उपमहापौर शर्मिला बाबर, माजी उपमहापौर तुषार हिंगे यांच्यासह पदाधिकारी आणि माथाडी कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. विजय हरगुडे यांनी केले. सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले, तर संतोष कांबळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *