क्रीडा ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ शिक्षण

एशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला तिरंदाजी संघाचा सुवर्णवेध

एशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला तिरंदाजी संघाचा सुवर्णवेध

प्रिथिका प्रदीपच्या ऐतिहासिक कामगिरीने पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा

अंतिम सामन्यात चीनवर 238-234 ने मात

उमेश सणस
पिंपरी : एची-नागोया एशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कंपाऊंड धनुर्विद्या संघाने शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात भारताने चीन संघाचा 238-234 अशा गुणांनी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
या ऐतिहासिक भारतीय संघामध्ये पिंपरी-चिंचवड शहराची अभिमानाची खेळाडू प्रिथिका प्रदीप, ज्योती सुरेखा वेन्नम आणि चिकिता तनीपार्थी यांचा समावेश होता. भारतीय संघाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळ करत आघाडी कायम ठेवली आणि अंतिम फेरीत अचूक निशाणा साधत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली.
भारताचा 238 गुणांचा अंतिम स्कोअर हा दक्षिण कोरियाने 2014 मध्ये नोंदवलेल्या जागतिक विक्रमाशी बरोबरी करणारा ठरला. भारतीय महिला कंपाऊंड संघाने एशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
उपांत्य फेरीत भारताने दक्षिण कोरियाचा 234-233 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. ज्योती सुरेखा वेन्नम यांचे हे एशियाई क्रीडा स्पर्धेतील चौथे सुवर्णपदक आहे, तर प्रिथिका प्रदीप आणि चिकिता तनीपार्थी यांनी आपल्या पहिल्याच एशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा मान मिळवला आहे. या विजयामुळे एशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या सुवर्णपदकांच्या यादीत आणखी एका मानाच्या पदकाची भर पडली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानाचा क्षण

प्रिथिका प्रदीपच्या या ऐतिहासिक यशामुळे पिंपरी-चिंचवड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात अभिमानाने उंचावले आहे. पिंपरी-चिंचवड आर्चरी असोसिएशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या धनुर्विद्येच्या विकासकार्याला आणि खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या संधींना या यशामुळे नवी प्रेरणा मिळाली आहे. पिंपरी-चिंचवडमधून घडलेली खेळाडू एशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक जिंकते, ही संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे. तिच्या या कामगिरीने केवळ पिंपरी-चिंचवडच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताचा गौरव वाढला आहे. प्रिथिकाच्या या यशामागे तिचे प्रशिक्षक कुणाल टावरे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, तांत्रिक प्रशिक्षण आणि मेहनत महत्त्वपूर्ण ठरली आहे. तसेच तिच्या पालकांनी दिलेला विश्वास, त्याग आणि सततचे प्रोत्साहन हे तिच्या यशाचे मजबूत आधारस्तंभ आहेत.
प्रिथिका प्रदीपची गुणवत्ता आणि तिच्यातील विशेष टॅलेंट शालेय वयात असतानाच ओळखण्याची संधी मला मिळाली. त्या छोट्या वयात तिच्यामध्ये दिसलेली जिद्द, मेहनत, शिकण्याची तयारी आणि खेळाप्रती असलेली निष्ठा आज एशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकापर्यंत पोहोचली आहे, याचा मला मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो. प्रिथिकाचे हे यश संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरा साठी व तसेच महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी गौरवाची बाब आहे. तिच्या या सुवर्ण कामगिरीमुळे देशातील अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल. या यशामध्ये प्रिथिकाची सातत्यपूर्ण मेहनत, तिचे प्रशिक्षक कुणाल टावरे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि तिच्या पालकांचा भक्कम पाठिंबा यांचे मोठे योगदान आहे. पिंपरी-चिंचवड आर्चरी असोसिएशनच्या माध्यमातून भविष्यातही अशाच प्रकारे गुणवंत खेळाडूंना योग्य प्रशिक्षण, संधी आणि व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.
– सोनल बुंदेले, सहसचिव महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना आणि सचिव, पिंपरी-चिंचवड आर्चरी असोसिएशन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *