ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ शिक्षण

रेडकेवस्ती (कळाशी) शाळेत माहिती अधिकार दिन उत्साहात

रेडकेवस्ती (कळाशी) शाळेत माहिती अधिकार दिन उत्साहात

रांगोळी, निबंध व वक्तृत्व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विजेत्यांचा यशोदा संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरव

इंदापूर : कळाशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेडकेवस्ती येथे २८ सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. माहिती अधिकाराचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे तसेच त्यांच्यामध्ये नागरिकांचे हक्क, पारदर्शकता व लोकशाही मूल्यांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. माहिती अधिकार दिनानिमित्त शाळेत रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी या तिन्ही स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कलागुणांना व विचारांना व्यासपीठ मिळवून दिले.
प्रत्येक स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या विद्यार्थ्यांना यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे इंदापूर तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांढरे व उपाध्यक्ष राहुल जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना माहिती अधिकाराचे महत्त्व, नागरिकांना असलेला माहिती मिळविण्याचा अधिकार तसेच लोकशाही व्यवस्थेत पारदर्शकतेची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला महिला व पुरुष पालक तसेच ग्रामस्थांचीही उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक सचिन शिवाजी अभंग सर, नितीन दिलीप मिसाळ सर, आरती भिकाजी गायकवाड मॅडम आणि रुक्मिणी पांडुरंग लवटे मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. माहिती अधिकार दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अधिकारांची जाणीव, सामाजिक जबाबदारी आणि लोकशाही मूल्यांची रुजवण करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *