गुन्हेगारी ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण सामाजिक

चित्रा वाघ यांनी घेतली कलाटे कुटुंबियांची भेट

चित्रा वाघ यांनी घेतली कलाटे कुटुंबियांची भेट

शिल्पा गवारे मृत्यूप्रकरणी; फास्ट ट्रॅक कोर्ट, वरिष्ठ अधिकाऱ्याकडून तपास आणि दोषींना कठोर शिक्षेची मागणी

उमेश सणस
पिंपरी : वाकड मधील शिल्पा गवारे यांच्या मृत्यूप्रकरणानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रविवारी (दि. ३०) कलाटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शिल्पा यांनी आपला १८ वर्षांचा संसार वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले; मात्र अखेर त्यांच्या वाट्याला मृत्यू आला, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात यावा, खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.
शिल्पा यांच्या मृत्यूनंतर माहेरच्या कलाटे कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. माहेरहून पैसे आणण्यासाठी तसेच वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळविण्यासाठी शिल्पा यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी कुटुंबीयांकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. मुले, कुटुंब आणि संसाराची जबाबदारी सांभाळत असतानाही त्यांना कथित छळाला सामोरे जावे लागल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याची भूमिका वाघ यांनी मांडली.

दोषींना कठोर शिक्षा द्या

शिल्पा यांच्या मृत्यूमुळे हुंडा, पैशांचा हव्यास आणि मालमत्तेसाठी विवाहित महिलांवर होणाऱ्या दबावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कायदे अस्तित्वात असतानाही अशा घटना सातत्याने घडत असल्याबद्दल वाघ यांनी चिंता व्यक्त केली. शिल्पा यांना न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा केला जाईल आणि दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली.

विविध राजकीय नेत्यांनी घेतली कलाटे कुटुंबियांची भेट

शिल्पा गवारे यांच्या मृत्यूनंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. भाजप आमदार अमित गोरखे आणि शिवसेना (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कलाटे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वाकड पोलीस ठाण्यात जाऊन तपासाचा आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संवाद साधून फास्ट ट्रॅक कोर्ट आणि विशेष सरकारी वकिलाबाबत आश्वासन दिले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *