गुन्हेगारी ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ सामाजिक

मद्यधुंद कार चालकाकडून पोलिसांना शिवीगाळ

मद्यधुंद कार चालकाकडून पोलिसांना शिवीगाळ

वाकड पोलिसांकडून गुन्हा दाखल

पिंपरी : मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवून एका वाहनाला धडक दिल्यानंतर कार डिव्हायडरवर आदळली. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार औंध-हिंजवडी बीआरटी मार्गावर रविवारी (दि. ३०) सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. यावेळी संबंधित चालकाने ‘तुमच्या कमिश्नरला बोलवा, मी इथेच आहे,’असे म्हणत पोलिसांशी अरेरावी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाकड पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला कायदेशीर नोटीस बजावली आहे.
शशांक प्रशांत खानवलकर (४०, रा. औंध) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. खानवलकर हा मद्यधुंद अवस्थेत औंध-हिंजवडी बीआरटी मार्गावर वाहन चालवत होता. वाहन चालवत असताना त्याच्या कारची अन्य एका वाहनाला धडक बसली. त्यानंतर त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावरील डिव्हायडरवर जाऊन आदळली. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीची पाहणी करून खानवलकर याला मद्यधुंद अवस्थेत तसेच इतर वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने वाहन चालवू नये, असे सांगत समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावेळी खानवलकर याने पोलिसांना उद्देशून शिवीगाळ केली. तसेच ‘तुमच्या कमिश्नरला बोलवा, मी इथेच आहे,’ असे म्हणत पोलिसांशी वाद घातल्याचे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी केलेल्या चित्रीकरणात दिसून येत आहे. दरम्यान, त्याने पोलिसांच्या अंगावर जाण्याचाही त्याने प्रयत्न केल्याचेही दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *