नेत्रदान मोहीम लोकचळवळ बनवणे गरजेचे : डॉ. भाग्यश्री थोपटे
उमेश सणस
पिंपरी : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टिदोष नियंत्रण कार्यक्रम (NPCBVI)नेत्रविभाग, जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्या’चे (२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२६) आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भाग्यश्री थोपटे- पाटील, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. अंजली कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व धन्वंतरीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी डॉ. भाग्यश्री थोपटे म्हणाल्या की, “दृष्टीहीन व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाशाची पहाट फुलवणे हे मानवतेतील अत्यंत श्रेष्ठ कार्य आहे. मरणोत्तर नेत्रदानाबाबत समाजात असलेल्या सर्व अंधश्रद्धा व गैरसमज दूर करून ही मोहीम लोकचळवळ बनवणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी स्वयंप्रेरणेने पुढे येऊन नेत्रदानाचा संकल्प करावा.”
जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. अंजली कुलकर्णी म्हणाल्या की, “आरोग्य विभागाच्या वतीने पुढील १५ दिवस रॅली, रांगोळी स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन आणि जनजागृती शिबिरे अशा विविध प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही मोहीम तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहावे.”
या उदघाटन कार्यक्रमास परिचारिका मंगल जाधव, डॉ. विक्रम काकडे, डॉ. प्रिया हरिदास, डॉ. प्रज्ञा निकम, नेत्रकक्ष प्रमुख नयना भालेकर, हेमलता गावित, नेत्रदान समुपदेशक सीमा मरळ, परिचारिका महाविद्यालयाच्या (नर्सिंग) विद्यार्थिनी व जिल्हा रुग्णालयातील इतर आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयश्री कांबळे यांनी आभार मानले.