सांगवी : जुनी सांगवी येथील महापालिकेच्या इंदिरा गांधी प्रसूतीगृहात सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देण्यात आले असून, मशीन हाताळण्यासाठी तज्ज्ञ रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या पल्लवी महेश जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, या सुविधेमुळे सांगवी परिसरातील गरीब व गरजू गर्भवती महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
इंदिरा गांधी प्रसूतीगृहात सोनोग्राफी मशीन बसविण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होती. मात्र, सोनोग्राफी मशीन आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती महिलांची गैरसोय होत होती. तपासणीसाठी महिलांना खासगी सोनोग्राफी केंद्रांमध्ये जावे लागत असल्याने सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक भार पडत होता.
ही समस्या लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक ३१च्या नगरसेविका पल्लवी महेश जगताप यांनी १५ मे २०२६ रोजी आमदार शंकर जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या महत्त्वाच्या सुविधेला प्राधान्य देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
पल्लवी जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाची जोड मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून कार्यवाही करण्यात आली. आता इंदिरा गांधी प्रसूतीगृहात सोनोग्राफी मशीन उपलब्ध झाले असून, तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्तीही करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील गर्भवती महिलांना स्थानिक महापालिका रुग्णालयातच सोनोग्राफी तपासणीची सुविधा मिळणार आहे.
या सुविधेमुळे गरीब व गरजू गर्भवती महिलांना खासगी सोनोग्राफी केंद्रांमध्ये जाण्याचा आर्थिक भार कमी होणार असून, वेळेवर तपासणी आणि आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार आहे. महापालिकेच्या प्रसूतीगृहात ही सुविधा उपलब्ध झाल्याने सांगवी परिसरातील महिलांसाठी हा महत्त्वाचा दिलासा ठरणार आहे.
“गरीब आणि गरजू कुटुंबातील गरोदर मातांचा खासगी तपासणीचा आर्थिक ताण कमी होऊन त्यांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी हा पाठपुरावा केला होता. आता सोनोग्राफी सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाल्याने सांगवी परिसरातील माता-भगिनींची मोठी सोय होणार आहे. या महत्त्वाच्या प्रश्नासाठी सहकार्य आणि सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आमदार शंकर जगताप यांच्यासह संबंधित सर्वांचे मनःपूर्वक आभार,” अशी प्रतिक्रिया नगरसेविका पल्लवी महेश जगताप यांनी व्यक्त केली