ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महा रक्तदान शिबिर’

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महा रक्तदान शिबिर’

उमेश सणस

पिंपरी : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या समाजसेवा प्रभागातर्फे विश्वबंधुत्व दिनानिमित्त देशव्यापी महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १९ व्या पुण्यतिथीनिमित्त २१ ते २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हे अभियान राबवले जात आहे.
मागील वर्षी दादीजींच्या १८ व्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात १ लाख युनिट रक्त संकलनाचा विक्रम करण्यात आला होता. यावर्षीही १ लाख युनिटचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याच अभियानाचा भाग म्हणून ब्रह्माकुमारीज् रहाटणी सेवा केंद्रातर्फे शनिवार (दि. २३) भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या वेळेत औंध जिल्हा रुग्णालय रक्तपेढी, पुणे यांच्या विशेष सहकार्याने पार पडले. रहाटणी परिसरातील नागरिकांनी व युवकांनी या मानवतावादी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन रहाटणी प्रभागाच्या नगरसेविका अर्चना विनोद तापकीर, प्रसिद्ध चिकित्सक डॉ. निशा तेली, रहाटणी केंद्र प्रभारी राजयोगिनी ब्रह्माकुमारी वर्षा दीदी, बी. के. अर्चना दीदी, बी. के. सुशीला दीदी व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. नेहमीच सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अर्चनाताई तापकीर यांनी यावेळी उपस्थित राहून ब्रह्माकुमारीजच्या या सेवाकार्याचे मनापासून कौतुक केले.

रक्तदान म्हणजे जीवनदान – बी. के. वर्षा दीदी

याप्रसंगी मार्गदर्शन करताना केंद्र प्रभारी राजयोगिनी बी. के. वर्षा दीदी म्हणाल्या, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या एका युनिट रक्ताने तीन जणांचे प्राण वाचू शकतात. रक्तदान केल्याने अशक्तपणा येत नाही, उलट आपल्या शरीरात २४ ते ४८ तासांत नवीन रक्त नैसर्गिकरित्या तयार होते. त्यामुळे प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान केले पाहिजे.

रक्तदात्यांचा सन्मान

कार्यक्रमाच्या शेवटी नगरसेविकाअर्चनाताई तापकीर आणि बी. के. सुशीला दीदी यांच्या हस्ते सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र, अल्पोपहार आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. करुणा, सेवा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देत या यशस्वी शिबिराची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *