पवना नदी खोऱ्यातील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा
उमेश सणस
पिंपरी : पवना नदीवरील सर्व ग्रामस्थ, नागरिक, शेतकरी तथा लाभधारक यांना पूर नियंत्रण कक्ष पवना धरण प्रकल्प पवनानगर याद्वारे कळविण्यात येते की, सद्यस्थितीमध्ये पवना धरण 100 टक्के भरलेले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच घाटमाथ्यावर पाऊस पडत असून, धरणामध्ये येवा प्राप्त होत आहे. पवना धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्याकरिता आज 8.00 वाजता नदीपात्रामध्ये एकूण 800 क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे.
पावसाचे प्रमाण व येवा पाहता हा विसर्ग 2500 क्युसेकपर्यंत टप्पाटप्प्याने वाढवला जाण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबतची आवश्यक माहिती विसर्गावेळी जलसंपदा विभागामार्फत देण्यात येईल.
सततच्या होणाऱ्या पर्जन्यामुळे ओढे व नदी नाल्यांच्या पाणीपातळीमध्ये अचानक वाढ होऊ शकते. नदीच्या सखल भागांमध्ये पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी पवना नदी खोऱ्यातील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदीपात्रातील आपले साहित्य, शेती अवजारे, कृषी पंप तथा जनावरे नदीपात्रापासून सुरक्षित ठिकाणी इतरत्र हलवण्यात यावीत. कोणत्याही प्रकाराच्या अफवांना बळी न पडता, प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे व तालुका/ जिल्हा/ शहर प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे.