ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण सामाजिक

‘पीएमआरडीए’च्या ‘स्ट्रक्चरल प्लॅन’ला गती

‘पीएमआरडीए’च्या ‘स्ट्रक्चरल प्लॅन’ला गती

सर्व शासकीय विभागांना आठ दिवसांत नियोजन सादर करण्याचे निर्देश !

मंजूर, विद्यमान आणि प्रस्तावित प्रकल्पांची प्रमाणित माहिती देण्याच्या महानगर आयुक्तांच्या विभागप्रमुखांना सूचना

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्राच्या सुनियोजित आणि शाश्वत विकासासाठी तयार करण्यात येणाऱ्या ‘प्रारूप संरचना योजने’च्या (स्ट्रक्चरल प्लॅन) कामाला आता गती मिळाली आहे. ही योजना अधिक परिपूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली अचूक माहिती आणि आगामी २० वर्षांचे नियोजन सर्व संबंधित शासकीय विभागांनी येत्या आठ दिवसांत सादर करावे. यात मंजूर, विद्यमान आणि प्रस्तावित प्रकल्पांच्या माहितीचा समावेश असावा, असे स्पष्ट निर्देश ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (दि. १ सप्टेंबर) दिले.
आकुर्डी येथील ‘पीएमआरडीए’च्या मुख्यालयात डॉ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय विभागांच्या प्रमुखांची समन्वय बैठक पार पडली. या वेळी अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, महानगर नियोजनकार स्मिता कलकुटकी, उपमहानगर नियोजनकार सौरभ पाटील यांच्यासह जिल्हा परिषद, महापालिका, पोलीस, एमआयडीसी, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, महापारेषण, पुणे मेट्रो, पीएमपीएमएल आणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत ‘स्ट्रक्चरल प्लॅन’च्या रूपरेषेवर सादरीकरण करण्यात आले. विविध विभागांमधील समन्वय आणि तांत्रिक बाबींवर सखोल चर्चा झाल्यानंतर महानगर आयुक्तांनी माहिती संकलनाबाबत स्पष्ट सूचना दिल्या. “विविध विभागांकडून प्राप्त होणारी माहिती हा नियोजनाचा गाभा आहे. त्यामुळे ही माहिती संबंधित विभागप्रमुखांनी प्रत्यक्ष तपासून आणि प्रमाणित करूनच सादर करावी, जेणेकरून भविष्यातील नियोजनात कोणतीही त्रुटी राहणार नाही,” असे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *