ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण वाहतूक सामाजिक

दिशा समितीच्या बैठकीत महापौर रवि लांडगे यांनी मांडले शहराचे प्रश्न

दिशा समितीच्या बैठकीत महापौर रवि लांडगे यांनी मांडले शहराचे प्रश्न

उमेश सणस
पिंपरी : पुणे येथे केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित दिशा समितीच्या बैठकीत पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रश्न प्राधान्याने मांडले. शहरातील पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतूक, नदी प्रदूषण आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र व राज्य शासन स्तरावर आवश्यक सहकार्य व पाठपुरावा करावा, अशी विनंती त्यांनी केली.
यावेळी पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार हेमंत रासने, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, विविध नगरपालिकांचे नगराध्यक्ष तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

चाकण–निगडी मेट्रोत आळंदी स्थानक

प्रस्तावित चाकण–निगडी मेट्रो मार्गिकेमध्ये आळंदी स्थानकाचा समावेश करण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी महापौर लांडगे यांनी बैठकीत केली. आळंदीचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व तसेच या परिसरात येणाऱ्या भाविकांची संख्या आणि भविष्यातील वाहतुकीची गरज विचारात घेऊन मेट्रोची सुविधा आळंदीला उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यासाठी आवश्यक परवानग्या मिळविण्यासह केंद्र शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष पाठपुरावा करावा, अशी विनंती त्यांनी केली. दिशा समितीसमोर सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, भक्ती शक्ती–मुकाई चौक–वाकड–नाशिक फाटा–वल्लभनगर–चाकण ही ४५.२९ कि.मी. लांबीची प्रस्तावित मेट्रो मार्गिका असून, त्यामध्ये ३४ स्थानकांचा प्रस्ताव आहे.

इंद्रायणी प्रदूषण नियंत्रण

इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्नही महापौर लांडगे यांनी गांभीर्याने उपस्थित केला. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी नदीक्षेत्राशी संबंधित सर्व महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय यंत्रणा व संबंधित प्राधिकरणांनी स्वतंत्रपणे कार्यवाही करण्याऐवजी परस्पर समन्वयातून ठोस आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करावा. प्रदूषणाची कारणे निश्चित करून सांडपाणी प्रक्रिया, प्रदूषण नियंत्रण आणि नदी संवर्धनाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना द्याव्यात, अशी विनंती त्यांनी केली.

पवना बंदिस्त जलवाहिनीबाबत केंद्र शासनाच्या सहकार्याची विनंती

तसेच, पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची आवश्यकता महापौरांनी अधोरेखित केली. या प्रकल्पाशी संबंधित विविध प्रलंबित बाबींवर सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन चर्चा करण्यासाठी संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी आणि पुढील कार्यवाही निश्चित करावी, अशी विनंती त्यांनी केली.
बैठकीत महापौर लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संबंधित विविध केंद्र पुरस्कृत योजना आणि विकासकामांचाही आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना, AMRUT2.0, स्मार्ट सिटी मिशन, पीएम स्वनिधी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, समग्र शिक्षा तसेच राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम यांसारख्या योजनांशी संबंधित प्रलंबित बाबींना गती देऊन केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयातून शहराला अधिकाधिक लाभ मिळावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. दिशा समितीच्या सादरीकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेशी संबंधित या विविध केंद्र पुरस्कृत योजनांचा समावेश करण्यात आला होता.
महापौर रवि लांडगे यांनी मांडलेल्या शहराच्या विविध प्रश्नांबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या. पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी केंद्र व राज्य शासनाशी सातत्यपूर्ण समन्वय ठेवून शहराच्या प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात येईल, असे महापौर लांडगे यांनी यावेळी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *