क्रीडा

पिंपरी-चिंचवडमध्ये ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचा थाटात प्रारंभ!

देशभरातील खेळाडूंचा सहभाग; पिंपळे सौदागरच्या क्लायम्बिंग वॉलवर रंगणार तीन दिवस क्रीडा कौशल्याचा थरार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवणाऱ्या ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिप २०२६ या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १३) पिंपळे सौदागर येथील योगा उद्यानातील क्लायम्बिंग वॉलवर उत्साहपूर्ण वातावरणात झाले. देशाच्या विविध भागांतून आलेल्या खेळाडूंच्या सहभागामुळे परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी नगरसदस्य शत्रुघ्न बाप्पू काटे, नाना काटे, अनिता काटे, कुंदा भिसे, तसेच देवांग नाईक, के. सरस्वती, श्रीकृष्ण कडुस्कर यांच्यासह विविध भागांतून आलेले खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र क्लायम्बिंग असोसिएशन आणि इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत देशभरातील खेळाडू सहभागी झाले असून, क्लायम्बिंग या साहसी क्रीडा प्रकारातील आपले कौशल्य, ताकद, चपळता आणि तंत्रकौशल्य दाखविण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजन होणे ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे. अशा स्पर्धांमुळे शहराची राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण होण्याबरोबरच स्थानिक खेळाडूंनाही प्रेरणा मिळते. पिंपळे सौदागर येथील जागतिक दर्जाच्या क्लायम्बिंग वॉलमुळे भविष्यात या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्याचा मार्गही मोकळा होऊ शकतो, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

शहरातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणे, नवोदित खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे आणि आधुनिक क्रीडा सुविधा निर्माण करणे यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. या स्पर्धेमुळे पिंपरी-चिंचवडच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा आणि राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *