मुख्यपृष्ठ

वाकड मेट्रो स्थानकाच्या विकासासाठी आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार!

फीडर बस, बहुमजली पार्किंग, स्कायवॉकसह विविध सुविधांसाठी अधिकाऱ्यांना केल्या सूचना; प्रवाशांशी साधला संवाद

प्रतिनिधी, पिंपरी, दि. १६ नोव्हेंबर : हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोचा प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर करण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. सोमवारी (दि. १६) त्यांनी वाकड चौक ते माण फेज ३ या मेट्रो मार्गावर प्रवास करून वाकड मेट्रो स्थानकाची पाहणी केली. यावेळी प्रवासी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि मागण्या जाणून घेतल्या.

हिंजवडी मेट्रोमुळे आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. मात्र, मेट्रोचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळण्यासाठी स्थानकांपर्यंत पोहोचण्याची सुविधा, पुरेशी पार्किंग व्यवस्था आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवांशी समन्वय असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांनी मेट्रो तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.

यावेळी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL), पीएमपीएमएल, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या प्रतिनिधींनीही विविध मागण्या मांडल्या.

हिंजवडी मेट्रो ही केवळ आयटी कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे, तर पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांसाठीही महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक सुविधा आहे. या मेट्रोमुळे पुनावळे, ताथवडे, वाकड, मामुर्डी, किवळे आणि रावेत परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे, असे आमदार जगताप यांनी सांगितले.

वाकड स्थानकाला प्रमुख वाहतूक केंद्र बनविण्याचा प्रयत्न

वाकड मेट्रो स्थानकाचा विकास करून ते प्रमुख वाहतूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी आमदार जगताप यांनी विविध सूचना केल्या. मेट्रो स्थानकांजवळ बहुमजली स्वयंचलित पार्किंग व्यवस्था उभारणे, स्थानकांपासून सुमारे १० किलोमीटर परिसरात नियमित फीडर बस सेवा सुरू करणे, यावर त्यांनी भर दिला.

वाकड स्थानकाला पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर, सांगवी, निगडी, रावेत आणि आळंदी परिसरातील बससेवेशी जोडण्याची सूचनाही त्यांनी केली. तसेच मेट्रो स्थानकांना निवासी आणि व्यावसायिक भागांशी जोडण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारे संरक्षित स्कायवॉक उभारण्याची गरज व्यक्त केली.

बस आणि मेट्रोसाठी एकत्रित तिकीट व्यवस्था

बस व मेट्रोचे मार्ग, वेळापत्रक, थेट लोकेशन आणि प्रवासखर्चाची माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी एकात्मिक प्रवास नियोजन ॲप विकसित करावे. तसेच मेट्रो आणि फीडर बससाठी एकत्रित तिकीट व्यवस्था व सवलतीचे पास उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

प्रवाशांच्या अडचणी आणि सूचनांचा नियमित आढावा घेण्यासाठी मेट्रो–प्रवासी समन्वय समिती स्थापन करावी. पादचारी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी आणि सायकलस्वारांसाठी स्थानक परिसर अधिक सुरक्षित व सोयीस्कर करावा, अशा सूचनाही आमदार जगताप यांनी केल्या.

या सर्व मागण्यांचा संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करून मेट्रो सेवा अधिक प्रभावी, प्रवासीस्नेही आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

.प्रतिक्रिया :

“हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो ही पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक सुविधा आहे. वाकड मेट्रो स्थानक प्रमुख वाहतूक केंद्र म्हणून विकसित झाल्यास पिंपरी-चिंचवडमधील अनेक भागांची कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होईल. यामुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल. नागरिकांनी मांडलेल्या सूचनांनुसार आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहे.”

शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *