आरोग्य ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण सामाजिक

आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते राहुल साबळे यांच्या कुटुंबाला ५ लाखांची मदत

आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते राहुल साबळे यांच्या कुटुंबाला ५ लाखांची मदत

– मदतीचा धनादेश मृत कामगाराच्या पत्नी आणि वडिलांकडे सुपूर्द

उमेश सणस

पिंपरी : स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेली विद्युत रोषणाई उतरवताना कासारवाडी ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या छतावरून पडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या कामगार राहुल साबळे यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे. शनिवारी (२९ ऑगस्ट) आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते या मदतीचा धनादेश मृत कामगाराच्या पत्नी आणि वडिलांकडे सोपविण्यात आला.
काळेवाडीतील विजयनगर येथील रहिवासी असलेले राहुल साबळे (वय ४३) हे एका कंत्राटदार कंपनीत कार्यरत होते. १५ ऑगस्टनिमित्त कासारवाडी येथील ‘ह’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या दोन मजली पत्र्याच्या छतावर चढून विद्युत रोषणाई उतरवण्याचे काम सुरू असताना, त्यांचा पाय घसरून ते थेट खाली कोसळले. या दुर्घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे साबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
पोटाची खळगी भरण्यासाठी काम करताना प्राण गमावलेल्या कष्टाळू कामगाराच्या कुटुंबाला सावरण्यासाठी आणि दिलासा देण्यासाठी आमदार जगताप पुढे आले. त्यांनी संपूर्ण प्रकारची माहिती घेतली. या साबळे कुटुंबाला सावरण्यासाठी तात्काळ आर्थिक मदत देऊन आधार दिला . २९ ऑगस्ट रोजी पिंपळे गुरव येथील जनसंपर्क कार्यालयात आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते हा धनादेश कुटुंबाला देण्यात आला. यावेळी कै. राहुल यांच्या पत्नी संगीता राहुल साबळे, तसेच वडील विठ्ठल महादू साबळे यावेळी उपस्थित होते. त्यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.
या वेळी ह प्रभाग अध्यक्षा तृप्ती कांबळे तसेच परिसरातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. जगताप यांनी यावेळी साबळे कुटुंबीयांचे सांत्वन करत या कठीण काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
“राहुल साबळे यांचा झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारा आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष अचानक निघून गेल्याने साबळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. जिवाचे मोल कोणत्याही मदतीने भरून निघू शकत नाही; परंतु या दुःखाच्या काळात त्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी आणि थोडासा आर्थिक आधार मिळावा यासाठी ही मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. या कठीण प्रसंगात आम्ही साबळे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”
– शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *