ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ वाहतूक सामाजिक

गणेश उत्सवात लेझरवर बंदी

गणेश उत्सवात लेझरवर बंदी

‘डीजे’चा आवाज मर्यादेत ठेवा; सांगवीतील गणेश विसर्जन रात्री १२ पर्यंत मिरवणुकीची सांगता करा

उमेश सणस
पिंपरी : सांगवीतील गणेश विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषणाबाबत पोलिस प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. ‘डीजे’चा आवाज निर्धारित मर्यादेत ठेवणे बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मिरवणुकीत लेझर लाइटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यंदा रात्री १२ वाजेपर्यंत विसर्जन मिरवणूक पूर्ण करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने गणेश मंडळांना केले आहे.
सांगवीतील गणेश विसर्जन मिरवणूक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि वेळेत पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ह’ प्रभागासह महावितरण आणि पोलिस प्रशासनाची संयुक्त बैठक झाली. बैठकीस पोलिस उपायुक्त संदीप आटोळे, सहाय्यक पोलिस आयुक्त मनीषा कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी, वाहतूक पोलिस निरीक्षक चंद्रकांत वाबळे, प्रशासन अधिकारी रामचंद्र येवले, महावितरणचे कनिष्ठ अभियंता अभय भंडारी तसेच महापालिकेच्या उद्यान विभागाचे कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
बैठकीत मिरवणूक मार्ग, वाहतूक व्यवस्था, विद्युत सुरक्षा, कृत्रिम विसर्जन हौद, मोठ्या मूर्तीचे स्थलांतर आणि ध्वनिप्रदूषणाबाबत चर्चा करून संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण १६० गणेश मंडळे असून, त्यापैकी ९२ मंडळांचे सातव्या दिवशी विसर्जन होते. मागील वर्षी मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्याने यंदा रात्री १२ वाजेपर्यंत विसर्जन मिरवणूक पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.

असा असेल मिरवणूक मार्ग

नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरातील मिरवणूक कृष्णा चौकातून सुरू होऊन शिवनेरी चौक, महालक्ष्मी मंदिर रस्ता, फेमस चौक, साई चौक आणि माहेश्वरी चौक मार्गे अहिल्यादेवी होळकर विसर्जन घाटावर पोहोचणार आहे. तर जुनी सांगवीतील मिरवणूक संविधान चौकातून सुरू होऊन बँक ऑफ महाराष्ट्र, शितोळेनगर, भगिनी निवेदिता बँक आणि मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करीत वेताळ महाराज उद्यानाजवळील विसर्जन घाटावर पोहोचणार आहे. या दोन्ही मार्गांची अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

बैठकीतील निर्णय

– विसर्जनानंतर मूर्तीची इतर ठिकाणी नेण्यासाठी पालिकेची वाहने वेळेत उपलब्ध करून देणार.
– पवना नदीपात्रात थेट मूर्ती विसर्जनास बंदी.
– काटेपुरम चौकातील बॅडमिंटन हॉलजवळ, वेताळ महाराज उद्यान आणि अहिल्यादेवी होळकर दशक्रिया घाटाजवळ कृत्रिम विसर्जन हौदांची व्यवस्था
मिरवणूक मार्गावरील धोकादायक विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्या वेळेत हटविण्याच्या महावितरण व उद्यान विभागाला सूचना
– कृष्णा चौक, क्रांतीनगर चौक आणि ढोरे चौक येथे विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार.
ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. लेझर लाइटचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. गणेश मंडळांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
– जितेंद्र कोळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सांगवी पोलिस ठाणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *