दहीहंडीचा खर्च टाळून चिमुकल्यांना अन्नदान
-अखिल नेताजीनगर दहीहंडी उत्सव समितीचा माणुसकीचा आदर्श
– उत्सवाचा खर्च सामाजिक उपक्रमासाठी
उमेश सणस
पिंपरी : उत्सवाची परंपरा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधत पिंपळे गुरव येथील अखिल नेताजीनगर दहीहंडी उत्सव समितीने यंदा दहीहंडी उत्सव साधेपणाने साजरा केला. दहीहंडी उत्सवासाठी होणारा खर्च टाळून पिंपळे गुरव येथील ममता अंध-अनाथ कल्याण केंद्र आणि दापोडी येथील सरस्वती अनाथ शिक्षण संस्थेतील चिमुकल्यांना दहीहंडीच्या निमित्ताने अन्नदान करण्यात आले. या उपक्रमातून उत्सवाचा आनंद वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जुनी सांगवी येथे लोखंडी कमान अंगावर पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर समितीने दहीहंडीचा उत्सवाचा खर्च टाळून तो सामाजिक उपक्रमासाठी देण्याचा निर्णय घेतला. जुनी सांगवी येथील दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद असल्याने परिसरात शोककळा पसरली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याबरोबरच सामाजिक संवेदनशीलता जपण्याचा निर्णय समितीने घेतला. सर्व वर्गणीदार आणि सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाचे रूपांतर एका विधायक सामाजिक उपक्रमात करण्याचा निर्णय समितीने घेतला. उत्सव केवळ जल्लोषाचा नसून, सामाजिक जाणीव आणि माणुसकी जपण्याचे माध्यमही ठरू शकतो, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. अनाथ आणि अंध चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य, त्यांच्या आनंदाचे क्षण आणि मिळालेला आपलेपणा हीच यंदाच्या दहीहंडी उत्सवाची खरी कमाई असल्याची भावना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सामाजिक बांधिलकी जपत समितीकडून यापूर्वीही विविध सेवा उपक्रम राबविण्यात आले असून, यापुढेही असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला.