ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण व्यवसाय शिक्षण सामाजिक

दिव्यांगांसाठी सुविधा, रोजगार आणि प्रशिक्षणाला चालना

दिव्यांगांसाठी सुविधा, रोजगार आणि प्रशिक्षणाला चालना

पिंपरी-चिंचवड शहर अधिक समावेशक करण्याचा निर्णय

दिव्यांग भवन फाउंडेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

उमेश सणस

पिंपरी : दिव्यांग नागरिकांना समान संधी, आवश्यक सुविधा आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देत त्यांचे जीवन अधिक सुलभ व सक्षम करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या दृष्टीने दिव्यांग भवन फाउंडेशनच्या संचालक मंडळाची बैठक आयुक्त तथा फाउंडेशनचे अध्यक्ष डाॅ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत दिव्यांगांच्या शिक्षण, रोजगार, कौशल्यविकास, पुनर्वसन, आरोग्य आणि सर्वांगीण सक्षमीकरणासंदर्भात विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, कंपनी सचिव गिरीश परळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, दिव्यांग भवन फाउंडेशनचे सल्लागार विजय कान्हेकर, वास्तुविशारद व सल्लागार अभिजित मुरुगकर यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील उद्यानांमध्ये संवेदनानुभव उद्यान 
दिव्यांग मुलांना आणि व्यक्तींना निसर्गाच्या सान्निध्यात आनंददायी व संवेदनात्मक अनुभव घेता यावा, यासाठी शहरातील विविध उद्यानांमध्ये ‘संवेदनानुभव उद्यान’विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उद्यानांमध्ये स्पर्श, ध्वनी, सुगंध आणि दृश्य अनुभवांच्या माध्यमातून दिव्यांग मुलांच्या संवेदनात्मक विकासाला चालना देण्यासोबतच त्यांना मनोरंजन आणि आनंदाचे हक्काचे स्थान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दिव्यांगांच्या रोजगारासाठी उद्योग क्षेत्राशी समन्वय

दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्य आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिव्यांग भवन फाउंडेशनच्या उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड परिसरातील तसेच आजूबाजूच्या विविध औद्योगिक वसाहतींमधील उद्योग आणि आस्थापनांशी समन्वय साधण्यात येत आहे. आतापर्यंत १२०० पेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींची नोंदणी झाली असून, त्यापैकी सुमारे ६५० व्यक्तींची माहिती तपासणी व कौशल्यनिहाय जुळवणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यापैकी ३५ दिव्यांग व्यक्तींना विविध आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, त्या समाधानकारकपणे कार्यरत आहेत, अशी माहिती फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांनी बैठकीत दिली. दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय उद्योग महासंघाचे संचालक प्रसाद बच्छाव यांच्याशी आयुक्त डाॅ.विजय सूर्यवंशी यांनी यावेळी संवाद साधला. त्यांच्या माध्यमातून विविध कंपन्यांशी संवाद साधून दिव्यांग व्यक्तींच्या रोजगारासाठी विशेष चर्चासत्र आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले.
सार्वजनिक सुविधा अडथळामुक्त करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव
दिव्यांग नागरिकांना शहरातील सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितपणे आणि सहजतेने वावरता यावा, यासाठी सार्वजनिक इमारती तसेच विविध नागरी सुविधांची सर्वंकष सुलभता तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीनंतर आवश्यक त्या सुधारणा करून सार्वजनिक सुविधा अडथळामुक्त करण्यासाठी केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीच्या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शहरातील सार्वजनिक इमारती, रस्ते, सुविधा आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सेवांमध्ये दिव्यांग व्यक्तींना सहज प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे.
दिव्यांग व्यक्तींच्या काळजीवाहूंसाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम
दिव्यांग व्यक्तींची दैनंदिन काळजी घेणाऱ्या काळजीवाहू व्यक्तींना आवश्यक कौशल्य आणि शास्त्रीय प्रशिक्षण मिळावे, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने काळजीवाहू प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस बैठकीत व्यक्त करण्यात आला. या प्रशिक्षणामुळे प्रशिक्षित काळजीवाहू व्यक्ती उपलब्ध होण्यास मदत होणार असून, दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना अधिक गुणवत्तापूर्ण सेवा व आधार मिळण्यास हातभार लागणार आहे. शिक्षण, कौशल्यविकास आणि पुनर्वसनाला प्राधान्य दिव्यांग भवन फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. दिव्यांग व्यक्तींचे शिक्षण, रोजगार, कौशल्यविकास, पुनर्वसन, आरोग्य, सामाजिक सहभाग आणि आर्थिक स्वावलंबन यासाठी सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *