पिंपरी चिंचवडसाठी भाजप कोअर कमिटी जाहीर
पक्षविरोधी भूमिका घेणार्या नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाईचा अधिकार कमिटीला
उमेश सणस
पिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील पदाधिकार्यांमधील मतभेद आणि समन्वयाचा अभाव वेळोवेळी दिसून आला आहे. त्याची दखल घेऊन पक्षाच्या प्रदेश समितीने कोअर कमिटीत काही बदल केले आहेत. कमिटी 23 सदस्यावरून 14 जणांची करण्यात आली आहे. त्यात पक्ष नेत्यासह युवा, महिला व इतर पदाधिकाऱ्यांना वगळण्यात आले आहे. मात्र, महापालिका कामकाजासंदर्भात समितीमध्ये पक्षनेत्याचा समावेश करण्यात आल्याचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दावा केला आहे.
शहर पातळीवर पक्षाचे धोरण ठरवणे, संघटनात्मक निर्णय घेणे आणि पक्षांतर्गत शिस्तपालन असे अधिकार कमिटीला आहेत. कोअर कमिटीच्या मान्यतेशिवाय किंवा चर्चेविना पदाधिकारी व नगरसेवकांनी कोणत्याही विषयावर माध्यमांसमोर किंवा जाहीरपणे प्रतिक्रिया देऊ नये, असा नियम आहे. महापालिकेचे कामकाज किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पक्षविरोधी भूमिका घेणार्या नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार कमिटीला आहे. पक्षासाठी व संघटनेसाठी काम करणार्या कार्यकर्त्यांचे योगदान पाहूनच त्यांना महत्त्वाची पदे किंवा जबाबदार्या देण्याचा अधिकार कमिटीला आहे. त्यामुळे भाजप पक्षात कोअर कमिटीला अधिक महत्व आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कामकाजातील पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतील गोंधळामुळे सत्ताधारी भाजपची नाहक बदनामी होत आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे वारंवार उघड झाले आहे. त्यावरुन विरोधक टीका करत आहेत. त्या प्रकाराची भाजप पक्ष प्रदेश समितीने दखल घेतली आहे. त्यानुसार कोअर कमिटीत काही बदल केल्याची व पदाधिकार्यांची कानउघडणी केल्याची चर्चा आहे. प्रदेश समितीनुसार कोअर कमिटीची सदस्यसंख्या 23 वरून 14 करण्यात आली आहे. कमिटी मर्यादित करण्यात आली आहे. शहर संघटनेसाठी कोअर कमिटी आहे. महापालिकेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी नियमित कोअर कमिटीसह सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांचा कमिटीत समावेश करण्यात आला आहे, असे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.