पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्जरोख्यांची (बाँड्स) राष्ट्रीय पातळीवर मोहोर
असोचेमतर्फे दोन मानाचे पुरस्कार प्रदान!
– कर्जरोख्यांच्या (बाँड्स) जोरावर विकासात्मक कामांसाठी थेट निधीची उभारणी : स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे
– विकासाला नवी दिशा देणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल
पिंपरी : देशातील अग्रगण्य असणाऱ्या असोचेम (Associated Chambers of Commerce and Industry of India)या संस्थेच्या वतीने कॉर्पोरेट बाँड मार्केटवरील नववी शिखर परिषद व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये महापालिकेला सुवर्ण श्रेणी अंतर्गत सर्वोत्तम पर्यावरण, सामाजिक आणि सुशासन म्हणजेच ईएसजी/हरित/स्थैर्य कर्जरोखे वितरक हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, तसेच रौप्य श्रेणी अंतर्गत सर्वोत्तम महानगरपालिका कर्जरोखे वितरक या पुरस्कार श्रेणीमध्ये महानगरपालिकेस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिली आहे.
महापालिका स्वतःच्या बळावर स्वतंत्रपणे निधी उभारणार
महापालिकेमार्फत शहर विकासाच्या अनुषंगाने एकूण चारशे कोटी रुपयांचे कर्जरोखे यशस्वीपणे उभारण्यात आले आहेत. महानगरपालिकेने कर्जरोख्यांच्या माध्यमातून भांडवली बाजारात यशस्वी प्रवेश करून विकासात्मक कामांसाठी थेट निधी उभारणीची एक अत्यंत नवी आणि प्रभावी दिशा निर्माण केली आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे महापालिकेला स्वतःच्या बळावर स्वतंत्रपणे निधी उभारण्याची क्षमता प्राप्त झाली असून, प्रशासकीय व आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.
महानगरपालिकेच्या हरित कर्जरोख्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी उभारणी करणे आणि त्याद्वारे शहर विकासाशी संबंधित विविध प्रकल्पांना व उपक्रमांना सातत्याने चालना देण्याचे उत्कृष्ट कार्य पार पाडण्यात आले आहे. तसेच, हरित महानगरपालिका कर्जरोख्याच्या माध्यमातून भांडवली बाजारातून निधी उभारणीतील भरीव योगदान आणि पारदर्शक कार्यपद्धतीची दखल घेऊन असोचेमतर्फे महानगरपालिकेला हे सुवर्ण व रौप्य पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. या राष्ट्रीय यशामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, देशभरात महापालिकेच्या लौकिकात भर पडली आहे.
“पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहर विकासाच्या अनुषंगाने चारशे कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारून भांडवली बाजारातून थेट निधी उभारणीची एक नवी आणि धाडसी दिशा निर्माण केली आहे. या यशस्वी उपक्रमामुळे आपल्या महानगरपालिकेला स्वतंत्रपणे निधी उभा करण्याची नवी क्षमता प्राप्त झाली असून, आर्थिक स्वावलंबनाच्या प्रवासात हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. असोचेमच्या राष्ट्रीय शिखर परिषदेअंतर्गत मिळालेला सुवर्ण श्रेणीचा सर्वोत्तम पर्यावरण, सामाजिक आणि सुशासन कर्जरोखे वितरक आणि रौप्य श्रेणीचा सर्वोत्तम महानगरपालिका कर्जरोखे वितरक हे दोन्ही प्रतिष्ठित पुरस्कार मिळणे ही आपल्या उत्तम प्रशासकीय नियोजनाची, दूरदृष्टीची आणि पारदर्शक कारभाराची अत्यंत महत्त्वाची पोचपावती आहे. हे यश आपल्या संपूर्ण शहरासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.”
– अभिषेक बारणे, सभापती- स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.