गुन्हेगारी ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ व्यवसाय सामाजिक

पिंपळे गुरवमध्ये गॅस सिलिंडरमधून गॅस चोरी

पिंपळे गुरवमध्ये गॅस सिलिंडरमधून गॅस चोरी

डिलिव्हरीपूर्वीच सिलिंडरमधून गॅस काढल्याचा आरोप; सांगवी पोलिसांत कामगारांवर गुन्हा दाखल

उमेश सणस

पिंपरी : ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचण्यापूर्वीच घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळे गुरव परिसरात उघडकीस आला आहे. भारत पेट्रोलियमच्या भैरवनाथ गॅस एजन्सीशी संबंधित डिलिव्हरी कामगारांकडून हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. तपासणीदरम्यान तब्बल १७ सिलिंडरमध्ये प्रत्येकी सुमारे पाच किलो गॅस कमी असल्याचे आढळून आले. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात संबंधित कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भैरवनाथ गॅस एजन्सीच्या गोदामातून ग्राहकांना देण्यासाठी भरलेले सिलिंडर डिलिव्हरी वाहनामध्ये भरले जात होते. त्यानंतर हे सिलिंडर ग्राहकांच्या घरी पोहोचवणे अपेक्षित होते. मात्र, डिलिव्हरीसाठी निघाल्यानंतर वाहन थेट ग्राहकांकडे न नेता एका खोलीवर नेले जात असल्याचा आरोप आहे. ग्राहकांनी सिलिंडर स्वीकारताना वजन आणि सीलची तपासणी करावी, तसेच सिलिंडरच्या वजनाबाबत संशय आल्यास तत्काळ संबंधित गॅस एजन्सी किंवा पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

नळीच्या सहाय्याने गॅस काढल्याचा आरोप

संबंधित ठिकाणी भरलेल्या सिलिंडरमधील गॅस नळीच्या सहाय्याने रिकाम्या सिलिंडरमध्ये भरला जात असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर गॅसचे प्रमाण कमी झालेले सिलिंडर ग्राहकांना वितरित केले जात असल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे ग्राहकांना पूर्ण क्षमतेचा सिलिंडर मिळत नसल्याने त्यांची आर्थिक फसवणूक होत होती. विशेष म्हणजे, घरगुती गॅस सिलिंडरची अशा पद्धतीने हाताळणी करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या प्रकारामुळे केवळ ग्राहकांची फसवणूकच नव्हे तर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

१७ सिलिंडरमध्ये गॅसची कमी

या प्रकरणात तपासणी करण्यात आल्यानंतर १७ सिलिंडरमध्ये प्रत्येकी पाच किलो गॅस कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. सांगवी पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधित डिलिव्हरी कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *