ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ सामाजिक

राष्ट्रीय मीडिया संमेलनात पिंपरी-चिंचवडच्या पत्रकारांचा ठसा

राष्ट्रीय मीडिया संमेलनात पिंपरी-चिंचवडच्या पत्रकारांचा ठसा

दीड-दोन हजार पत्रकारांच्या उपस्थितीत मान्यवरांचा सन्मान

‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी माउंट आबू दुमदुमले

उमेश सणस
माउंट आबू : देशभरातून दीड ते दोन हजार पत्रकारांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रीय मीडिया सम्मेलन-२०२६ मध्ये पिंपरी-चिंचवडच्या पत्रकारांनी विशेष ठसा उमटवला. राष्ट्रीय संमेलनातील प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्याचा बहुमान पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारांना मिळाला. शहराच्या पत्रकारितेसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला. ब्रह्माकुमारी संस्थेच्या मीडिया व जनसंपर्क प्रभागातर्फे आयोजित या संमेलनाचा विषय ‘श्रेष्ठ विश्वाच्या निर्मितीसाठी सशक्त मीडिया’असा होता. सकारात्मक, मूल्यनिष्ठ आणि जबाबदार पत्रकारितेचा संकल्प यावेळी करण्यात आला.

सशक्त मीडिया ही विश्वनिर्मितीची शक्ती : करुणाभाई

मीडिया विंगचे अध्यक्ष राजयोगी बी. के. करुणाभाई यांनी समाजात सकारात्मकता, शांतता आणि सद्भावना निर्माण करण्यासाठी माध्यमांनी जबाबदार भूमिका बजावावी, असे सांगितले. भारत विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. पत्रकारांनी स्वतः शांततेचा अनुभव घेऊन तो समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.

मीडिया ‘पॉवरफुल’सोबत ‘पर्पजफुल’ही हवा : निकुंज भाई

मीडिया व जनसंपर्क प्रभागाचे राष्ट्रीय समन्वयक बी. के. निकुंजभाई यांनी एआय व आधुनिक तंत्रज्ञानामुळे माध्यमांची ताकद वाढली आहे, असे सांगितले. मात्र, ही ताकद सकारात्मक दिशेने वापरण्यासाठी मनही सशक्त असणे आवश्यक आहे. त्यामुळे मीडिया केवळ ‘पॉवरफुल’नव्हे, तर ‘पर्पजफुल’ असावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकारितेने समाजाला दिशा द्यावी : डॉ. संजय द्विवेदी

ज्येष्ठ पत्रकार व जनसंचार तज्ज्ञ डॉ. संजय द्विवेदी यांनी पत्रकारितेचे काम केवळ बातमी देणे नसून समाजाला योग्य दिशा देणे असल्याचे सांगितले. पत्रकारांनी निष्पक्षपणे काम करावे आणि स्वतः न्यायाधीशाची भूमिका घेऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘फॉरवर्ड’करण्यापूर्वी सत्यता तपासा : डॉ. सरफराज सैफी

भारत न्यूज नेटवर्कचे सीईओ व एडिटर-इन-चीफ डॉ. सरफराज सैफी यांनी मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभच नव्हे तर तिची ‘धडकन’ असल्याचे सांगितले. सोशल मीडियावरील माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची सत्यता आणि संभाव्य परिणाम तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

एआयच्या युगात माध्यमांची जबाबदारी वाढली : राणा यशवंत

न्यूज इंडिया नेटवर्कचे सीईओ व एडिटर-इन-चीफ राणा यशवंत यांनी एआय, मशीन लर्निंग आणि सायबर वॉरच्या युगात माध्यमांसमोरील आव्हाने वाढल्याचे सांगितले. बदलत्या तंत्रज्ञानासोबत पत्रकारितेनेही अधिक जबाबदार आणि सजग होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवडच्या पत्रकारांकडून मान्यवरांचा सन्मान

यावेळी पुणे येथील महाअस्र मराठी पत्रकार महासंघाचे अध्यक्ष संजय मराठे यांनी बी. के. करुणाभाई यांचा, खजिनदार उमेश पाटील यांनी बी. के. सरलादीदी यांचा तर पिंपरी-चिंचवड येथील थरार न्यूजचे रोहित खर्गे यांनी बी. के. निकुंजभाई यांचा सन्मान केला. ज्येष्ठ पत्रकार दादाराव आढाव आणि पत्रकार शबनम सय्यद यांनीही मान्यवरांचा सत्कार केला. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व शाल देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला. सन्मान सोहळ्यानंतर महाराष्ट्रातील पत्रकारांनी उत्स्फूर्तपणे ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा दिल्या. घोषणांनी संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले.

शहरातून मोठा सहभाग

संमेलनात पिंपरी-चिंचवडमधून प्रवीण शिर्के, तौफिक सय्यद, उमेश सनस, माऊली भोसले, गजाला सय्यद, सारिका भिंगे, रफिक सय्यद, शबनम सय्यद, सुरेखा काजरोळकर, शबाना शेख, पूजा पंडित, कलिंदर शेख, किसन भोसले, शिवाजी घोडे, सुनीता कुमारी, पूनम पाटील, संतोष महामुनी, लीना माने, श्रीधर जगताप, अभिजीत पाटील, संगीता पाचंगे, संतोष सागवेकर आणि सिताराम मोरे आदी पत्रकार सहभागी झाले.

यावेळी ‘मूल्यनिष्ठ मीडिया’या त्रैमासिकाच्या प्रथम अंकाचे तसेच ‘Echoes of Soul’ आणि ‘वरदान’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *