ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण व्यवसाय सामाजिक

विसर्जन घाटांवर सुरक्षा, सुविधांची महापौर लांडगे यांच्याकडून पाहणी

विसर्जन घाटांवर सुरक्षा, सुविधांची महापौर लांडगे यांच्याकडून पाहणी

स्वच्छता, सुरक्षा व नागरिकांच्या सुविधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश

उमेश सणस
पिंपरी : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख विसर्जन घाटांवर करण्यात आलेल्या स्वच्छता, सुरक्षा आणि नागरिकांसाठीच्या सुविधांची महापौर रवि लांडगे यांनी पाहणी केली. विसर्जनाच्या दिवशी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व आवश्यक सुविधा वेळेत पूर्ण करून मनुष्यबळ व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
महापौर लांडगे म्हणाले, गणेशोत्सव हा श्रद्धा आणि उत्साहाचा सण आहे. गणेश विसर्जनाची प्रक्रिया सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडणे आवश्यक आहे. विसर्जनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुरक्षित व सुलभ सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. विसर्जन घाटांवरील स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी, निर्माल्य संकलन, दिशादर्शक फलक, कृत्रिम विसर्जन हौद आणि सुरक्षा व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
विसर्जन घाटांवर भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रवेश व बाहेर पडण्याचे मार्ग सुकर ठेवावेत. घाट परिसरात चिखल, घसरडेपणा अथवा पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. घाट परिसरातील स्वच्छता सातत्याने राखण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावे, अशा सूचनाही महापौरांनी दिल्या.
निर्माल्यकुंडांची योग्य ठिकाणी व्यवस्था करा
निर्माल्य नदीपात्रात किंवा जलस्रोतांमध्ये जाणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देताना निर्माल्यकुंडांची योग्य ठिकाणी व्यवस्था करून त्याबाबत स्पष्ट दिशादर्शक फलक लावावेत, असे त्यांनी सांगितले. विसर्जनस्थळी निर्माण होणारा कचरा तातडीने संकलित करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. नागरिकांनीही निर्माल्य व इतर पूजासाहित्य जलस्रोतांमध्ये न टाकता महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
लहान गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम विसर्जन हौदांमध्येच करावे
लहान गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम विसर्जन हौदांमध्येच करावे. शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन शक्यतो घरीच स्वच्छ पाण्यात करावे. नदी, नाले आणि इतर जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा आणि ‘स्वच्छ, सुंदर पिंपरी चिंचवड’घडविण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर लांडगे यांनी केले.
घाटांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवा
विसर्जन घाटांवरील सुरक्षा व्यवस्थेबाबत कोणतीही तडजोड न करण्याच्या सूचना देताना आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवावी, जीवनरक्षकांची नियुक्ती करावी, अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवावीत आणि मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी सातत्यपूर्ण समन्वय राखावा, असे त्यांनी निर्देशित केले. भाविकांना विसर्जन प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी दिशादर्शक व स्थलदर्शक फलक ठळकपणे लावावेत, असेही त्यांनी सांगितले.
विभागीय समन्वय व सुरक्षिततेवर भर
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विसर्जन व्यवस्थेच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. विसर्जन घाटांवरील कृत्रिम विसर्जन हौदांची स्वच्छता, आवश्यक डागडुजी, प्रकाशयोजना आणि सुरक्षा व्यवस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवावी. घाट परिसरातील विद्युत तारा, जोडण्या व विद्युत उपकरणांची सुरक्षितता तपासून कोणतीही धोकादायक स्थिती निर्माण होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी निर्देशित केले.
विविध विसर्जनस्थळांची पाहणी
महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांसमवेत शहरातील विविध प्रमुख विसर्जन घाटांची संयुक्तपणे पाहणी केली. यामध्ये सुभाष घाट, पिंपरी, अहिल्यादेवी होळकर घाट, वेताळ महाराज घाट, सांगवी, वाकड गावठाण घाट, चिंचवड येथील थेरगाव पूल घाट, जाधववाडी घाट, रावेत, इंद्रायणी नदी घाट तसेच मोशी खाण या प्रमुख विसर्जनस्थळांचा समावेश होता.
विसर्जनाच्या दिवशी वाढणारी गर्दी लक्षात घेता प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील विसर्जनस्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध असल्याची खात्री करावी. घाट परिसर, विसर्जन मार्ग आणि परिसरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता सातत्याने राखावी. भाविकांना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्याची तातडीने दखल घेऊन संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत विसर्जनाची संपूर्ण व्यवस्था सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावी.
– डॉ. सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *