ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण

पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाला गती देण्यासाठी अनुभवी अधिकारी हवा

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन
महापालिकेच्या शहर अभियंतापदी मनोज सेठीया यांची नियुक्ती

​पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर हे महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय वेगाने प्रगती करणारे शहर आहे. या शहराचा विस्तार आणि नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा पाहता, आपल्या महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागावर फार मोठी जबाबदारी असते. रस्ते, पाणी, उड्डाणपूल आणि पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये कोणतीही तडजोड चालत नाही. मनोज सेठीया यांच्यासारखा दांडगा तांत्रिक अनुभव असलेला अधिकारी शहर अभियंतापदी आल्यामुळे नक्कीच आपल्या विकासाच्या प्रत्येक कामाला गती आणि पारदर्शकता येईल, अशा शब्दांत स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी नवनिर्वाचित शहर अभियंता मनोज सेठीया यांच्या कर्तृत्त्वाचा गौरव केला.
पालिकेच्या शहर अभियंतापदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मनोज सेठीया यांचा स्थायी समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी सभापती अभिषेक बारणे यांनी सेठीया यांच्या आजवरच्या कामाच्या शैलीचे आणि अनुभवाचे खुलेपणाने कौतुक केले.
या सत्कारानंतर आपले मनोगत व्यक्त करताना शहर अभियंता मनोज सेठीया यांनीही स्थायी समिती सभापती आणि पदाधिकाऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महापालिका पदाधिकारी आणि प्रशासकीय नेतृत्वाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, ती मी पूर्ण निष्ठा, प्रामाणिकपणा आणि वेळेच्या अचूकतेने पार पाडेन. शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा देणे आणि प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावणे हेच माझे मुख्य ध्येय असेल, अशी ग्वाही यावेळी सेठीया यांनी दिली.
​या वेळी, अतिरिक्त आयुक्त निलेश जंगम, तृप्ती सांडभोर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख तसेच स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते.

शहरातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार नागरिक सुविधा द्या
​पुढे बोलताना बारणे म्हणाले की, सेठीया यांनी आपल्या सेवाकाळात नेहमीच प्रशासकीय शिस्त आणि कामाचा वेग कायम ठेवला आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या कानाकोपऱ्यात ज्या विविध विकासकामांचे नियोजन सुरू आहे, त्यांना प्रत्यक्ष जमिनीवर उतरवण्याचे मोठे आव्हान शहर अभियंता पदावर असते. मनोज सेठीया यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग अधिक जोमाने काम करेल आणि शहरातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार नागरिक सुविधा मिळवून देण्याच्या आमच्या स्वप्नाला आणखी बळ मिळेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *