दिव्यांगांसाठी सुविधा, रोजगार आणि प्रशिक्षणाला चालना
पिंपरी-चिंचवड शहर अधिक समावेशक करण्याचा निर्णय
दिव्यांग भवन फाउंडेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
उमेश सणस
पिंपरी : दिव्यांग नागरिकांना समान संधी, आवश्यक सुविधा आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देत त्यांचे जीवन अधिक सुलभ व सक्षम करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या दृष्टीने दिव्यांग भवन फाउंडेशनच्या संचालक मंडळाची बैठक आयुक्त तथा फाउंडेशनचे अध्यक्ष डाॅ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत दिव्यांगांच्या शिक्षण, रोजगार, कौशल्यविकास, पुनर्वसन, आरोग्य आणि सर्वांगीण सक्षमीकरणासंदर्भात विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, कंपनी सचिव गिरीश परळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, दिव्यांग भवन फाउंडेशनचे सल्लागार विजय कान्हेकर, वास्तुविशारद व सल्लागार अभिजित मुरुगकर यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील उद्यानांमध्ये संवेदनानुभव उद्यान
दिव्यांग मुलांना आणि व्यक्तींना निसर्गाच्या सान्निध्यात आनंददायी व संवेदनात्मक अनुभव घेता यावा, यासाठी शहरातील विविध उद्यानांमध्ये ‘संवेदनानुभव उद्यान’विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उद्यानांमध्ये स्पर्श, ध्वनी, सुगंध आणि दृश्य अनुभवांच्या माध्यमातून दिव्यांग मुलांच्या संवेदनात्मक विकासाला चालना देण्यासोबतच त्यांना मनोरंजन आणि आनंदाचे हक्काचे स्थान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दिव्यांगांच्या रोजगारासाठी उद्योग क्षेत्राशी समन्वय