ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण सामाजिक

कर्जतच्या विकासाचा रोडमॅप कुठे?; प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांचा सचिन घुले यांना थेट सवाल

कर्जतच्या विकासाचा रोडमॅप कुठे?; प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांचा सचिन घुले यांना थेट सवाल

चार वर्षांत तीन पक्ष बदलले, चार वर्षे सत्ता उपभोगली; मग विकास कुठे?

दुसऱ्यांवर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या कारभाराकडे बघा

आमदार रोहित पवारांचा सत्तांतराशी संबंध नसल्याचा खुलासा

कर्जत : कर्जत नगरपंचायतमधील सत्तांतरामध्ये आमदार रोहित पवार यांचा हात नाही. नगराध्यक्ष अविश्वास ठराव असो किंवा नवीन नगराध्यक्ष निवड असो, यामध्ये त्यांचा काहीही संबंध नाही, असा स्पष्ट खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक नामदेव (देवा) राऊत यांनी केला आहे. नगराध्यक्ष निवडीच्या वेळेसच चारही नगरसेवकांनी ही भूमिका स्पष्ट केली होती. हा निर्णय स्थानिक पातळीवर केवळ नगरपंचायतपुरता मर्यादित आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

घुले यांच्या कारभारावर गंभीर आरोप

हा निर्णय घेण्यामागचा उद्देश स्पष्ट करताना विद्यमान नगरसेवक राऊत यांनी नगराध्यक्ष रोहिणी घुले यांच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत. घुले यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कालावधीमध्ये घंटागाडीद्वारे कचरा संकलन केले जात नव्हते. शहरात सर्वत्र दुर्गंधी पसरली होती व शहरातील साफसफाई पूर्णपणे विस्कळीत झाली होती. शहराला पाणीपुरवठ्यामध्ये टी-शल पावडर व तुरटी आणि तांत्रिकदृष्ट्या वापरला जाणारा गॅस याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून गाळमिश्रित पाणी शहराला दिले जात होते. शहरातील अनेक भागांमध्ये विद्युत दिवे बंद होते.

नागरिकांची लूट आणि अडवणूक

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्जत शहरातील नागरिकांची अडवणूक केली जात होती. नागरिकांच्या नगरपंचायतमधील दोन दिवसांच्या कामासाठी महिना महिना अडवणूक केली जायची आणि कामांमध्ये मुख्याधिकारी यांना पुढे करून मोठी आर्थिक लूट केली जात होती. या सर्व विषयामुळे कर्जत नगरपंचायत हद्दीतील नागरिक हैराण झाले होते. म्हणूनच रोहिणी घुले यांच्यावरील अविश्वास ठरावात आम्ही भाग घेतला व शहरातील नागरिकांची होणारी छळवणूक थांबवली, असे राऊत यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा सत्तेमध्ये थेट सहभागी नाही. छाया शेलार या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष आहेत आणि सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कसल्याही प्रकारच्या सत्तेमध्ये सहभागी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विकासाचा रोडमॅप कुठे ?

घुले यांनी आमदार रोहित पवार व शरदचंद्र पवार पक्षावर टीका करण्याअगोदर थोडे स्वतःकडे वळून पहावे, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. चार वर्षांमध्ये तीन पक्ष बदलून पावणेतीन वर्षे उपनगराध्यक्ष व एक ते सव्वा वर्ष नगराध्यक्ष पद भोगले असताना कर्जत शहराच्या विकासाचा रोडमॅप तुम्ही काय तयार केला आणि काय विकास केला हे अगोदर तुम्ही जनतेसमोर ठेवा आणि जनतेला उत्तर द्या. तुमचा विकासाचा रोडमॅप कर्जत शहरातील सुज्ञ जनतेला माहीत आहे. शहरातील गोरगरीब टपरीधारक, व्यापारी यांच्या बांधकामामध्ये तुम्ही व्यापाऱ्यांना कशी वागणूक दिली हे संपूर्ण कर्जत शहराला माहिती आहे. कर्जत शहर व उपनगरातील ज्या नागरिकांच्या घराचे बांधकामे, कॉम्प्लेक्स बांधकामे चालू होती, त्या बांधकामधारक नागरिकांना कोणाच्या माध्यमातून कशा नोटिसा दिल्या, नोटिसा देण्यामागचा उद्देश काय होता आणि तो उद्देश कसा सफल करून घेतला हेही कर्जत शहरातील सर्व नागरिकांनी ओळखले आहे. भविष्यात धडा शिकवणार असे खूप विषय आहेत जे नागरिकांना माहीत आहेत आणि नागरिकांनी तुम्हाला ओळखले आहे. योग्य वेळी ते नागरिकांसमोर आम्ही मांडू. उगाच आमदार रोहित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्यावर बोलण्याचा प्रयत्न करू नये. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जत शहराचा काय विकास झाला आहे तो मुद्देसूदपणे अनेक वेळा जनतेसमोर मांडला आहे आणि यापुढेही आम्ही मांडत राहू.

सत्तेवरून पायउतार व्हावे लागल्याने कासावीस

आम्ही सत्ता आली तरी विनम्रतेने स्वीकारतो आणि सत्ता गेली तरी महाविनम्रतेने ते सत्य स्वीकारतो. तुम्हाला सत्तेवरून पायउतार व्हावे लागल्याने तुमचा जीव कासावीस झाला आहे. तुम्ही शहरामध्ये सध्या कशी आदळआपट आणि तांडव करत आहात हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. जनता तुम्हाला भविष्यात नक्कीच धडा शिकवेल, असा इशाराही नामदेव राऊत यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *