३ टोळ्यांतील २३ जणांवर मोक्का; ९ जणांवर तडीपारीची कारवाई
उमेश सणस
पिंपरी :आगामी ईद-ए-मिलाद, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सांगवी पोलिसांनी सराईत व समाजविघातक प्रवृत्तीच्या गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. तीन गुन्हेगारी टोळ्यांमधील तब्बल २३ सराईत आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. हे आरोपी सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
याशिवाय दोन सराईत आरोपींवर एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई, तर सात आरोपींवर महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम ५६ अन्वये तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सण-उत्सवांच्या काळात गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यास मदत होणार असून, परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होणार आहे.
नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन
परिसरात संशयास्पद हालचाल अथवा समाजविघातक प्रकार आढळल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपायुक्त संदिप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.